संभाजीनगरमध्ये ३० परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करणार
छत्रपती संभाजीनगर: भूमी अभिलेख विभागामार्फत करावयाच्या जमीन मोजणीसाठी आता अभिकरणामार्फत ३० परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्यास मान्यता मिळाली असून यासंदर्भातील निविदा सुचना https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे, असे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ.विजय वीर यांनी कळविले आहे.
मर्यादित मनुष्यबळामुळे मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून अभिकरणामार्फत ३० परवानाधारक भूमापकांची निवड करण्यात येणार आहे,असेही डॉ. वीर यांनी कळविले आहे. दोन वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असेल असेही यानिविदेत स्पष्ट करण्यात आले आहे. या निविदा ई-निविदा पद्धतीने दि.१९ मे पर्यंत मागविण्यात आल्या आहेत. दि.२१ रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. निविदेच्या इतर अटी व शर्ती संकेतस्थळावर पाहता येतील.
०००००